गुरुचरित्र – एक चिंतन

“अवतार हे उदंड होती । सर्वची मागुती विलया जाती ।
तैशी नव्हे दत्तात्रेय मूर्ती । नाश कल्पांती असेना ॥”

सर्व विश्‍वात भारतभूमी ही देवभूमी आहे. तशीच ती ऋषीमुनींची तपोभूमी आणि ज्ञानभूमीपण आहे. मानवासाठी तिची कर्मभूमीतपण गणना होते. साधुसंतांनी तर तिच्या रोमारोमातून भक्ती फुलवली आहे. ‘आधी करावे ते कर्म, कर्म मार्गे उपासना ॥ उपासका सांपडे ज्ञान, ज्ञाने मोक्षची पावणे ॥’ ही त्रिसुत्री येथील जीवनधारा आहे. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि आत्यंतिक सुखाची प्राप्ती व्हायला पाहिजे असेल तर ज्ञान मिळविणे हे क्रमप्राप्त आवश्यक आहे. कर्माने चित्ताची शुद्धता होते. उपासनेने, भक्तीने, चित्ताला स्थिरता येते आणि शुद्धता आणि स्थिरता एकत्र नांदायला लागली की तेथेच ज्ञान प्रकट होते. मनुष्य जन्म कृतार्थ होतो. कर्म आणि उपासना हे साधनरूप आहेत तर ज्ञान हे साध्यरूप आहे.

परमेश्‍वराचे अनेक अवतार झाले आहेत. पुढेही होणार आहेत. त्याच कार्यकारणभाव भगवंताने वेळोवेळी प्रकटही केला आहे. भगवत्गीतेत त्याने तो सांगितला-पण आहे. “यदा यदा ही धर्मस्य… ॥1॥ परित्राणाय साधुनां… ॥2॥ यातील पहिला श्‍लोक कारणरूप आहे तर दुसरा श्‍लोक कार्यरूप आहे. अधर्माचा नाश आणि धर्माची स्थापना हे कारण आहे. तर साधुंचे रक्षण करून दुष्कृतांचा नाश हे कार्य आहे. वेळोवेळी हे मला करावे लागले, असे भगवंत म्हणतात. याशिवाय मी आणखीन हे एक कार्य करतो. ते म्हणजे या पृथ्वीतलावर शुद्ध ज्ञान प्रकट करतो. अज्ञानांधस्थ लोकस्य… तस्मै श्री गुरवे नमः आणि मला त्यासाठी गुरुतत्त्वाच्या आविष्काराचा स्वीकार करावा लागतो. कारण व कार्य येथे एकरूप होते. साधन आणि साध्य एकजीव होतात. द्वैतभाव समाप्त होतो. शुद्ध ईशरूपी ज्ञानाशिवाय या जगात, विश्‍वात दुसरी कांही वस्तू नाही. “नही ज्ञानेन सदृशं पवित्र मिह विद्यते ।” आणि ही माझी सायुज्य मुक्ती आहे.

भगवंताने या आपल्या मनोगताप्रमाणे कृतयुगात जो अवतार धारण केला तो महर्षी अत्रि आणि त्यांची पतिव्रता पत्नी सती अनसूया यांच्या पोटी दत्तात्रय हे नांव धारण करून. भगवान विष्णुंचा हा ज्ञान अवतार झाला. अत्रि ऋषींची तपस्या आणि अनसूयेचे पातिव्रत्य या प्रभावाने सर्व विश्‍वाची उत्पत्ती, स्थिती आणि लय करणारे ब्रह्मा, विष्णु आणि शंकर या तिन्ही देवांची एकत्रित शक्ति असणारा हा दत्तात्रय कृत युगापासून त्रेता, द्वापार आणि कली या चार युगात ज्ञानदानाचे कार्य अखंडितपणे करीत आहे. काशी क्षेत्री स्नान, करवीर क्षेत्री भिक्षा आणि माहूर क्षेत्री निद्रा अशी ही स्मर्तृगामी देवता आहे. ही ज्ञानाची अधिष्ठात्री देवता असल्याने परशुराम, सहस्रार्जुन, कार्तवीर्य, अलर्क अशांचे ते गुरू आहेत. अनेक पंथ, संप्रदाय यांचे विचारात एकमेकात मतभेद असले तरी हे सर्वजण दत्तात्रेयां अनन्य आहेत, विनम्र आहेत. सर्व पंथाच्या आणि संप्रदायांच्या ज्ञान गंगेचा उगम श्रीदत्तात्रयांपासून झाला आहे. हेच मूळ गुरुपीठ आहे.

कलियुगात लोक अज्ञानी झाले. किंकर्तव्यमूढ झाले तेव्हा भगवान दत्तात्रेयांनी आंध्र प्रदेशातील पीठापूर ग्रामी श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने आपळराजा आणि सुमती यांचे पोटी जन्म घेतला. शके 1242 म्हणजे इ.स. 1320 मध्ये हा जन्म झाला. आणि या अवतारातील कार्य पूर्ण झाल्यावर काही कालानंतर त्यांनी विदर्भ भागातील कारंजे या गावी श्रीगुरू नरसिंह सरस्वती, जन्मनाव नरहरी या नाम उपाधीने माधव आणि अंबाभवानी या दांपत्याचे ठिकाणी जन्म घेतला. शके 1300 म्हणजे इ.स. 1378 हे त्यांचे जन्म साल आहे. श्रीपाद श्रीवल्लभाचे आयुर्मान तीस वर्षांचे होते. तर नृसिंह सरस्वतींचा अवतारकाल ऐंशी वर्षे इतका दीर्घ होता. यांनी केलेल्या धर्मकार्याचा इतिहास ज्या प्रासादिक ग्रंथात केला आहे त्या ग्रंथाचे नाव आहे ‘गुरुचरित्र’. या ग्रंथाची तीन कांडात विभागणी असून ज्ञानकांड, कर्मकांड आणि भक्तिकांड अशी याची विषयवार नांवे आहेत. अवतरणिकेसह याचे बावन्न अध्याय असून 7491 ओव्यांचा हा मोठा ग्रंथ आहे. दत्तसांप्रदायिकांत हा ग्रंथ वेदतुल्य मानला जातो.

एक, तीन किंवा सात दिवसांत याची पारायणे केली जातात. श्रीपाद श्रीवल्लभ आणि नरसिंह सरस्वती यांचे हे अवतार चरित्रकार्य असून श्रीगुरूंच्या निजानंदी गमनानंतर शंभर वर्षांनंतर लिहिले गेले आहे. श्रीगुरु नरसिंहसरस्वतींचा शिष्य संप्रदाय मोठा होता. त्यात त्यांचे चार पट्टशिष्य होते. सिद्ध, नंदी, नरहरी आणि सायंदेव. त्यात सिद्ध आणि सायंदेव हे दोघे अंतरंग शिष्य होते. सायंदेवाचा पुत्र नागनाथ, नागनाथांचा पुत्र देवरात म्हणून होता. त्याचा पुत्र गंगाधर. गंगाधराचा पुत्र सरस्वती अशी ही अनुवंश परंपरा होती. कर्नाटक राज्यातील कडगंची गावातील कुलकर्णी वतन त्यांचेकडे होते. वंश परंपरेने गुरुभक्ती यांचे घराण्यात होती. सरस्वती गंगाधर हा सायंदेवापासून पाचवा पुरुष साखरे हे त्यांचे उपनाम होते.

एके दिवशी सरस्वती गंगाधराला उपरिती झाली. आणि तो श्रीगुरूंच्या शोधार्थ घराबाहेर पडला. सतत गुरूचे मुखात नामस्मरण चालू होते. मला माझ्या श्रीगुरूचे केव्हा दर्शन होईल. माझ्या पूर्वजांवर त्यांनी कृपा केली. आमच्या घराण्याचे ते उपास्य दैवत. मला ते केव्हा भेटतील ? सुयोगाने त्या एका गहन अरण्यात त्याला एक सत्पुरुष भेटला. तो सत्पुरुष श्रीगुरू नरसिंह सरस्वतींचा अंतरंग शिष्य सिद्ध म्हणून होता. त्याला सरस्वती शरण गेला. त्याची गुरुभक्तिची व्याकुलता पाहून त्याला त्याच्या अंतकरणात सिद्धांचे श्रीगुरूंचे दर्शन घडविले. सरस्वती गंगाधराची समाधी लागली. थोड्यावेळाने तो भानावर आला. त्याच्या मस्तकावर हात ठेवून ते सिद्ध म्हणाले, तू आता सरस्वती गंगाधर राहिला नाहीस तर नामधारक या पदाला पोचला आहेस. असे म्हणून त्यांनी त्याला त्याच्या हातात एक पुस्तक दिले. सिद्धपुरुष हे लहानपणापासून श्रीगुरूंच्या सतत सान्निध्यात असल्याने त्यांनी त्यांचे अवतारकार्य प्रत्यक्ष पाहिले होते, अनुभवले होते आणि त्यावरून ते पुस्तक लिहिले होते. आणि त्या पुस्तकावरून नामधारकाने जी पोथी तयार केली ते ‘गुरुचरित्र’ या नावाने प्रसिद्धीस पावली. आणि त्यामुळे दत्तसांप्रदायिकाला एक तत्त्वज्ञान रूप ग्रंथाचा आधार मिळाला. तो या संप्रदायाचा एक प्रमाणग्रंथ ठरला. गुरुभक्तिने ओतप्रत भरलेला हा ग्रंथ आहे. आणि त्याला अनुलक्षून अनेक कथांच्या माध्यमातून गुरुतत्त्व सिद्ध केलेले आहे.

कथांचे दोन भाग आहेत. एक ऐतिहासिक कथा आणि दुसर्‍या पौराणिक कथा. श्रीगुरूंच्या अवतार कार्यात प्रत्यक्षदर्शी घडलेल्या कथा आणि गुरुतत्त्व, गुरुभक्ती आणि गुरुनिष्ठा आणि प्रतिकूल काळात पण धर्मधैर्य ढळू न देता आपले स्वकर्तव्य, ईश्‍वराच्या साक्षीने कसे करावे याचा वस्तुपाठ या दोन्ही कथांतून साधक भक्ताला मिळतो. सिद्धांत कळण्यासाठी दृष्टांतरूप अशा या कथा गुरुचरित्रात आल्या आहेत.

गुरुचरित्राची मांडणी करताना सरस्वती गंगाधर म्हणजेच नामधारकाने म्हटले आहे, माझी मातृभाषा कानडी आहे. तरीपण हे गुरुचरित्र मी महाराष्ट्रभाषेत ओवीबद्ध स्वरूपात लिहिणार आहे. खरे म्हणजे श्रीगुरूंचे हे अवतार कार्य मराठी भाषेत प्रकट झाले. ही फार चांगली आणि मराठी भाषिकांवर उपकार करणारी घटना घडली. नामधारकाची भाषा अतिशय नेटकी आणि भक्तिभाव रसाने भरलेली अशी आहे.

संपूर्ण चौदावे शतक आणि पंधरावे शतकाचा मध्य म्हणजेच जवळजवळ दीड शतकाच्या या काळात श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्रीगुरू नरसिंह सरस्वती या दोन दत्तावतार महापुरुषांचा या भरतभूमीत संचार होता. त्यावेळी या भरतभूमीची स्थिती मोठी बिकट होती. इस्लामी आक्रमण होऊन पांचशे वर्षांचा काळ लोटला होता. वैदिक हिंदू धर्माची वाताहात झाली होती. सक्तीचे धर्मांतर, स्त्रियांवर अत्याचार, मंदिरांचा विध्वंस हिंदू समाजाला जगणे अशक्य होऊन बसले. किंकर्तव्य मूढ अशी मानसिक अवस्था भरतभूमीतील सर्व समाजाची झाली. अशा या अवस्थेत लोकांना निर्भय करून कर्तव्यपरायण करण्याचे कार्य या दोन महापुरुषांनी केले.

या धर्मकार्याची मुहूर्तमेढ श्रीपादश्रीवल्लभांनी आपल्या अल्प जीवनात रोवली तर श्रीनरसिंह सरस्वतींनी आपल्या दीर्घ जीवनात हिंदू धर्माला संजीवनी दिली. श्रीपादश्रीवल्लभांनी ब्रह्मचारी राहून जीवन व्यतीत केले तर श्रीनरसिंह सरस्वतींनी संन्यासी होऊन जीवन व्यतीत केले.

सिद्ध आणि नामधारक यांच्या संवादातून हे गुरुचरित्र उलगडत जाते. प्रारंभ करताना सरस्वती गंगाधराने प्रथेप्रमाणे गणेशादि देवतांचे स्मरण करून ऋषी, मुनी, कवी आणि आपल्या पूर्वजांना वंदन केले आहे. श्री गुरुंच्या दर्शनासाठीची व्याकुळता त्याच्या मुखातून बाहेर पडते. तो म्हणतो, ‘देव असो वा गुरू, त्याला काही दिल्याशिवाय तो आपल्याला देत नाही.’ ‘घेशी तेव्हा देशी ऐसा तू उदार’ हा सिद्धांत त्याने या पहिल्या अध्यायात अनेक दृष्टांत देऊन व्यक्त केला आहे. तो पुढे म्हणतो, ‘मी तुला काही दिले नाही पण माझ्या पूर्वजांनी तुझी एकनिष्ठेने आणि निरपेक्षतेने सेवा केली आहे. तुला ऋणी केले आहे. ते ऋण तू आता व्याजासह मला परत करून चरणाशी ठाव दे.’ या त्याच्या काकुळती होऊन केलेल्या प्रार्थनेने गुरूंनी त्याला दर्शन दिले. नामधारक धन्य झाला.

यापुढे दुसर्‍या अध्यायापासून कथांच्या माध्यमातून गुरू महात्म्यच सांगितले आहे. या कथांमधील तत्त्व आणि त्यातील रहस्यांचे चिंतन आपण यथानुशक्ती करणार आहोत. सर्व एक्कावन्न अध्यायांच्या प्रत्येक अध्यायाच्या शेवटी “इतिश्री सिद्धनामधारक संवादे” प्रथम, द्वितीय इत्यादि अध्याय समाप्त असे म्हटले आहे. दुसर्‍या अध्यायात ब्रह्मदेवाच्याकडून सृष्टीचा प्रारंभ सांगून कालनिर्णयासाठी चार युगांची निर्मिती सांगितली. कृत, त्रेता, द्वापार, कली ही ती चार युगे असून युगकर्तव्य सांगितली. ब्रह्मदेवाचा कलियुगाशी संवाद आहे. धर्मनीतिचा र्‍हास होऊन अधर्म बळावेल याचे वर्णन विस्ताराने केले असून सामान्य मनुष्याचा थरकांप होईल असे ते वर्तमान आणि भविष्यकाळाचे वर्णन आहे. यातून सात्त्विक वृत्तीच्या मनुष्याला सद्गुरूच तरून नेतील. ईश्‍वरीतत्त्व आणि गुरुतत्त्व लक्ष्यार्थाने एकच असून वाच्यार्थाने भिन्न आहे. दुष्कर्म्याला ईश्‍वर कडक शासन करतो तर गुरु क्षमा करून सत्कर्माला लावतो. ईश्‍वराच्या कोपापासून गुरू वाचवितो. पण गुरूंचा कोप झाला तर ईश्‍वर काही करू शकत नाही. “गणेशोवाऽग्निना युक्तो विष्णुना च समन्वितः वर्णद्वयात्मको गुरू तत्त्व मंत्रश्‍च सिद्धिदः” गणेश, अग्नि आणि विष्णु या तत्त्वापासून गुरुतत्त्व सिद्ध झालेले आहे. असे गुरुमहात्म्य असून प्रपंच आणि परमार्थ मार्गात दीप स्तंभाप्रमाणे मार्गदर्शक आहे. तो सर्व जाणता आहे. म्हणून समर्थ रामदास म्हणतात, “इहलोक साधया कारणे । जाणत्याची संगती धरणे । परलोक साधया कारणे । सद्गुरु पाहिजे ॥ गुरुभक्ति करावी आणि कशी असावी यासाठी एक गुरू वेदधर्म आणि संदीपक नावाचा त्यांचा शिष्य याची कथा सांगितली आहे. कुठलेही कर्म आणि त्याचे परिणाम प्रत्येक जीवाला भोगावे लागतातच.

गुरुवाचून शुद्धज्ञान प्राप्त होतच नाही. त्यासाठी निर्मळ मनाने गुरुसेवा केली पाहिजे. ‘गुरु कृपा ज्यासी होय । यमाचे मुख्य भय नाही’ मृत्यूचे भयच नाहीसे होते. त्यााठी गुरूची प्रसन्नता आणि प्रसाद प्राप्त करून घेतला पाहिजे. संत गुलाबराव महाराज म्हणत असत “गुरूचा वर भयंकर नाही, तसा शापही भयंकर नाही; पण त्याने आपली उपेक्षा केली तर मात्र भयंकर आहे.” प्रत्यक्ष ईश्‍वर भेटूनसुद्धा त्याने गुरुभक्तिवाचून काही मागितले नाही.

तिसर्‍या अध्यायात दत्तजन्माचा उपक्रम सांगून दत्तात्रयांची अवतार कथा वर्णन केली आहे. अनसूयेचा पतिव्रता धर्म सांगून तिच्या सामर्थ्याचे वर्णन केले आहे. “तुका म्हणे पतिव्रता । तिची देवावरी सत्ता ॥” असे ते दत्तात्रेय सर्वत्र संचार करीत असताना पीठापुरी अवधूत वेषात भिक्षेसाठी गेले. त्या ब्राह्मणाकडे श्राद्ध होते पण माध्याह्नकाळी गुरू दत्तात्रेय भिक्षेसाठी येतात हे ब्राह्मण पत्नीस माहीत होते. भिक्षेकर्‍याकडे पाहिल्यानंतर हे तिच्या लक्षात पण आले. श्राद्धाचे ब्राह्मण जेवल्याशिवाय भिक्षा घालता येत नाही. आता काय करावे ? हा तिच्यापुढे प्रश्‍न पडला. धर्मनिर्णय घेण्यासाठी पतीपण घरात नाही. एक क्षणभर डोळे मिटून सात्त्विक शुद्ध भावाने अंतर्मुख होऊन आत्मप्रमाणाने अवधूतांना तिने भिक्षा घातली. दत्तप्रभू प्रसन्न झाले. तिला वर दिला की माझ्यासारखा पुत्र तुला होईल. तो हा श्रीदत्तात्रयांचा कलीयुगातील मानवी प्रथम अवतार, श्रीपादश्रीवल्लभ होय. सोळाव्या वर्षी आपले दत्तरूप आईला दाखवून लोकउद्धारासाठी बाहेर पडले. तीन वर्ष गोकर्ण क्षेत्री तपश्‍चर्या केली. आर्त, अर्थार्थी, जिज्ञासु आणि ज्ञानी भक्तांना मार्ग दाखविला.

रावणाला शंकराकडून आत्मलिंगाची प्राप्ती आणि गणेशकृत त्याची स्थापना या सहाव्या अध्यायात रावणाची कथा आली आहे. अहंकारामुळे रावणाचा उद्देश कसा असफल झाला हे या कथेत सांगितले. अहंता गुणे सर्वही नाश आहे.

गुरू वसिष्ठांचा अपमान केल्यामुळे ब्रह्मराक्षस झालेल्या मित्रसह राजाची कथा या अध्यायात आली असून गोकर्ण क्षेत्र महात्म्यपण आले आहे. गुरू द्रोह नाशाला कसा कारण होतो हे तत्त्व येथे लक्षात येते.

श्रीगुरू प्रसन्नतेने एका मंदमती ब्राह्मण पुत्राला विद्या संपन्न करून त्याला आणि त्याच्या मातेला आत्महत्येपासून निवृत्त करून आत्महत्या हे महापाप आहे असे तिला सांगितले. कुठल्याही परिस्थितीत आत्महत्या करू नये असा संदेश कुरवपुरच्या वास्तव्यात श्रीपादांनी दिला. आत्महत्या महापाप आहे. शनिप्रदोष व्रताने गुरुशंकराची प्रसन्नता होऊन चांगला शुभदर्शी जन्म प्राप्त होतो. ‘उपासनेचा आश्रय मोठा’ एक अनन्य भक्ती करणारा धोबी त्याला इच्छा झाली राजा होण्याची. वासनाक्षय झाल्याशिवाय गुरुपद प्राप्त होत नाही. हे त्याला सांगून त्याला राजपद, ऐश्‍वर्य देऊन इच्छापूर्ती त्याची करून पुढील जन्मी त्याला मुक्ती दिली आणि येथे आपली अवतार समाप्ती केली. आणि श्रीपादांनी अधिक कार्य करण्यासाठी नरहरी नावाने कारंजे येथे जन्म घेतला. त्यांच्या पश्‍चात् कुरवपुराचा महिमा वाढला. भक्तांचे मनोरथ पूर्ण करणे हे गुरूंचे कार्य आहे. तेथे देहाने नसले तरी शुद्धात्मा स्वरूपाने त्यांनी वल्लभेश ब्राह्मणाला कृतार्थ केले.

श्रीगुरू नृसिंहसरस्वती स्वामीमहाराज अवतारात श्रीदत्तांचे कार्य फार मोठे आहे. गुरुचरित्राचे नायक तेच आहेत. जन्मताच ओंकाराचा उच्चार करून सातव्या वर्षापर्यंत मौन पाळून वाचा सामर्थ्य वाढविले. मुंजीबंधनानंतर ऋग्वेद, यजु, साम, अथर्व या वेदांच्या मंत्राचे उच्चारण सहा शास्त्रांचे अध्यापन करून आपल्या दत्तावताराची मातापित्याला जाणीव करून दिली. ‘उपजताची ज्ञानी होय’ ही माऊलीची उक्ती सार्थ ठरविली. आठव्या वर्षी शिवभूमी काशी क्षेत्री संन्यास घेऊन अधिकाराप्रमाणे उपदेश करून सामान्य आणि विद्वानांना सन्मार्ग दाखविला. अनेक शिष्य झाले. केदार, बद्री इ. सर्व उत्तराखंडाची यात्रा करून लोकस्थिती पाहून त्यांचा उद्धार केला. सर्व शिष्यसमुदायासह ते करंज गावी आले. आपल्या मातापित्यांना भेटून बंधु, भगिनीवर्गाला भेटले. सर्वांना उपदेश केला. आणि तेथून त्र्यंबकेश्‍वराचे दर्शन घेऊन गोदावरी काठाने बासर ग्रामी आले. तेथे एक ब्राह्मण पोटदुखीने त्रस्त होऊन आत्महत्या करीत होता. त्याला त्यापासून परावृत्त करून व्याधिमुक्त केले. सिद्ध सांगतायेत, हे नामधारका तेथे तुझे पूर्वज सायंदेव आले होते. बिदर या बादशहाकडे ते नोकरीला होते. त्यापासून त्याला भयमुक्त केले. “श्रीगुरू मृत्युचे भय नाहीसे करतात”. तेथून वैजनाथ क्षेत्री आले. शिष्य समुदाय खूप वाढला होता. सर्वांना चारी दिशेला धर्मप्रसारासाठी पाठवून दिले. अवतारातील हे एक उद्दिष्ट होते. एकदा गुरू केला की त्यावर पूर्ण निष्ठा ठेवून त्याला आत्मसमर्पण करावे हेच शिष्याचे कर्तव्य आहे. काही दिवस औदुंबर क्षेत्री वास करून कृष्णा पंचगंगा संगमी बारा वर्षे ते राहिले. अनेकांचा उद्धार केला. तेथून गाणगापुरी येऊन राहिले. अनेकांची अनेक दुःखे नाहीशी करीत लोकांना आत्मनिर्भर केले. दंभ करू नका, स्वतःशी प्रामाणिक रहा, ब्राह्मण हे समाजाचे गुरू आहेत. त्यांनीही कुठलाही लोभ न ठेवता सर्व समाजाला प्रबुद्ध केले पाहिजे. द्रव्याच्या हव्यासापायी यवनांची चाकरी करून आपल्याच धर्माची हानी होऊ देऊ नये, गुरुचरित्रात ब्राह्मणांना असा उपदेश गुरूंनी केला आहे. आपल्या वैदिक धर्मात दुही माजून समाजात कलह होऊ नये यासाठी ज्ञानी व्यक्तीनी सतर्क राहिले पाहिजे. आपल्या धर्माचा स्वाभिमान राखला पाहिजे. धर्मनिष्ठा, धर्मधैर्य टिकविले पाहिजे. “स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः” हे श्रीकृष्ण सूत्र त्यांनी सगळ्यांवर बिंबविले.

गुरुचरित्रात नुसते चमत्कार नाहीत. त्याच्या मागे रोखठोक कार्यकारण भाव आहे. एक दत्तभक्त कुटुंब. तरुणपणातच पतीचे निधन झाले. तिची पतीनिष्ठा मोठी होती. तिच्या पत्नीला गुरूंनी जीवंत केले. एकाने गुरूंजवळ शंका काढली. अपमृत्यू हे दैवलिखित असताना आपण त्याला जीवंत कसे केले. श्रीगुरू म्हणाले, त्याच्या पुढच्या जन्मातील तीस वर्षे मी ब्रह्मदेवाकडून उसनी मागून घेतली आहेत. पुढच्या जन्मातून ती वजा होतील. आयुष्य हे श्‍वासावर अवलंबून आहे. प्राणायामादि क्रियेने मनुष्य आपले आयुष्य वाढवूपण शकतो. स्त्रियांचा आचार कसा असावा, पुरुषांनी कशारीतीने आचारविचार धर्म पाळावा. याचे विवरण गुरुचरित्रात वाचायला मिळते. कुठल्याही टोकाला न जाता समयात्मक, समतोलपणे जीवन जगावे. अव्याभिचारिणी भक्ती गुरूंची केली तर सर्व संकटातून तरून जाल. अशा तर्‍हेचा उपदेश गुरुचरित्रात ठायी ठायी आहे. आधी देह शुद्धी मग मन शुद्धी नंतर आत्मशुद्धीने गुरुपदाला पावाल. समाजातील सर्व थरातील लोकांचा उद्धार श्रीगुरूंनी केला. बिदरचा बादशाह व्याधिग्रस्त झाला. त्याला व्याधिमुक्त केले. त्याने नगरात येण्याचा आग्रह केला. गुरूंनी अट घातली. गोहत्या करणार नाही, मंदिरांचा विध्वंस करणार नसशील तर तुझ्याकडे येतो. त्याने मान्य केले. मगच गुरू तिकडे गेले. गाणगापुरात बावीस वर्ष निवास करून सर्वांना अभय देत बहुधान्य नाम संवत्सरी श्रीशैल्य मल्लिकार्जुन सन्निधी निजानंदी ठायी बैसले.

वे. मू. श्रीकांत चितळे गुरुजी,
आळंदी. भ्र. 9975981368

Share your love